गुरुवार, २२ ऑक्टोबर, २००९

कुठतरी थांबावं लागतच.~~


असाच मी एकदा सूट्टी घेऊन गोव्याला गेलो होतो.गोव्याच्या समुद्राच्या किनारपट्टीवर अनेक छोटी छोटी घरं आहेत.एक घर भाड्याने घेऊन मी थोडे दिवस राहत होतो.आमच्या बाजूच्या घरात एक जोडपं असंच काही दिवस मजेत घालवण्यासाठी येऊन राहिलं होतं.सुरवातीला आम्ही सकाळीच ऊठून समुद्र किना‌र्‍यावर फिरायला म्हणून जात होतो.सकाळीच कोळ्यांच्या मासे जाळ्यात पकडून टोपल्या भरभरून आणणार्‍या मोठ्या होड्या किनार्‍यावर आल्यावर कुतुहल म्हणून निरनीराळ्या प्रकारचे मासे निवडून आणलेल्या टोपल्यामधून आम्हाला हवे ते मासे त्यांच्याकडून विकत घेऊन दुपारच्या जेवणाला त्याचा उपयोग करायचो.ताज्या मास्यांची चव निराळीच असते.त्यामुळे रोज मासे खायची चटकच लागली होती.

आमचे शेजारी सुद्धा हळू हळू आमच्याच बरोबर सकाळीच ऊठून आम्हाला त्यांची कंपनी द्दायला लागले.त्यानाही मासे खाण्यात दिलचस्पी होती. त्यामुळे त्यांची आमची चांगलीच गट्टी जमली होती.हे आमचं शेजारचं जोडपं आमच्या नंतर आणखी काही दिवस गोव्याला राहाणार होतं.
अधिक चौकशी केल्यावर कळलं की त्यांच्या पत्नीला गोवं खूपच आवडायला लागल्याने त्यानी त्यांचा मुक्काम आणखी वाढवला होता. ते जवळपास आमच्या बरोबरच जायला निघणार होते.पण आता त्यानी विचार बदलला होता.बोलता बोलता कळलं की त्यांच्या बायकोला सर्विकल कॅनसरचा आजार झाला असून तिचा तो टर्मिनल आजार होता.हे ऐकून मला खूपच वाईट वाटलं.

गोवा सोडून परत निघण्यापूर्वी एकदा असेच आम्ही संध्याकाळी किनार्‍यावर त्यांच्या बरोबर फिरायला गेलो होतो.पौर्णिमेचा तो दिवस होता.समुद्राच्या फेसाळ लाटावर चंद्राचा प्रकाश पडून त्या जास्तच फेसाळलेल्या दिसत होत्या.थंड वारा पण आल्हादायक वातावरणात भर घालत होता.चालून चालून थोडे पाय दमले म्हणून जवळच वाळूत बसून गप्पा मारत होतो.
बोलता बोलता त्यांची पत्नी म्हणाली,
“माझ्या लहानपणी मला आठवतं माझी आई बरेच वेळा म्हणायची,
“जीवन असं जगावं की शेवटी पश्चाताप होऊ नये.
सदा सर्वदा प्रत्येकजण मरत असतो आणि जगत असतो.तुमचा काय अनुभव आहे ह्याचं यतार्थ चित्र तुम्ही तुमच्या मनात तयार केलं पाहिजे.तुमच्या बुद्धिमतेपूर्वक तुम्ही निवड केली पाहिजे.”
ती तशीच जगली.ती एका प्रसिद्ध मुलींच्या शाळेची प्रिन्सीपॉल होती.खेळाच्या दुनियेत तिनं नांव कमावलेलं होतं.आणि तिन सुदृढ मुलीना जन्म देऊन माझ्या वडीलाना संसारात मदत करून एका खेड्यात निवृतीच्या दिवसात लागणारं छोटसं घर बांधण्यात मदत करूं शकली.तिला हवं ते ती निमूटपणे करून आणि वयाच्या पंचायशी वर्षावर शांतिने निर्वतली.

पश्चाताप न होता आयुष्य़ जगणं हा मला तिच्याकडून मिळालेला धडा होता.मी माझ्या शिक्षणासाठी पैनपै जमवून शिकले आणि देशात जमेल तिथे प्रवास केला.चांगलं कार्य समजून समाजात जमेल तेव्हडी सेवा केली.पंचवीस वर्षाच्या माझ्या करियर मधे मी बर्‍याच मुलीना शिकवलं.
मी आणि माझ्या पतिने तिन मुलांच व्यवस्थित संगोपन केलं.आणि पाच नातवंडाच्या सहवासात आनंदाने जीवन कंठित आहो.
मी मला नशिबवान समजते की माझ्या पतिने मला माझ्या मर्जीचं जीवन जगायला संपूर्ण मूभा दिली.
मला आणखी शिक्षण मिळावं म्हणून त्याने घर संभाळून मदतीसाठी खूप धडपड केली.

अलीकडे एकाएकी माझ्या पोटात वेदाना येऊन खूप दूखू लागलं.आणि त्याचं निदान काढलं गेलं की मला सर्विकल कॅन्सर झाला आहे.त्याच्यावर उपाय म्हणून औषध उपचार केले गेले. मला डॉक्टर म्हणाले की मी जेमतेम एक वर्ष काढीन.पण मी माझं तत्वज्ञान सोडायला तयार नव्हते. मला जरा बरं वाटलं की मी माझ्या अनुभवाचं गाठोडं माझ्या पाठीवर मारते.मी मीत्रमैत्रिणीना भेटते,प्रवास करते,हंसत असते,चांगली पुस्तकं वाचते,नातवंडाबरोबर खेळते आणि जे माझ्यावर प्रेम करतात त्यांचा हृदयापासून सन्मान करते.

माझ्या जीवनावर माझा विश्वास आहे.कदाचीत एकवेळ अशी येईल-बहूदा डॉक्टरांच्या भाकिताच्या पलिकडे जाऊन-ज्यामुळे मला जगताना अत्यानंद व्ह्यायचा तो आनंद कमी होईल.त्यानंतर मात्र माझ्या आई सारखं मी करीन.माझ्या कुटूंबाबरोबरच्या माझ्या आठवणी मी ताज्या करीन.
आणि जो ऐकील त्याला मी सांगेन,
“जीवन असं जगावं की शेवटी पश्चाताप होऊ नये”

किनार्‍यावर एव्हाना खूप काळोख झाला होता.पण चंद्राच्या शितल चांदण्यात आणि त्या थंड वार्‍याच्या
वातावरणात त्यांच्या पत्नीची ही कथा ऐकून माझं मन खूपच उदास झालं .परंतु उद्दा सकाळीच मी गोवं सोडून परत जाणार असल्याने,त्यांची कंपनी पण सोडवत नव्हती.पण काय करणार कुठतरी थांबावं लागतच.

1 टिप्पणी: