शनिवार, ५ मार्च, २०११

सुखाचा शोध ...


‘मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं?’
प्रशांत दामलेच्या एका लोकप्रिय नाटकातलं त्यानंच गायलेलं हे गीत म्हणजे मला तमाम माणसांच्या मनाच्या भावना अधोरेखित करणारं गीत वाटतं. प्रत्येक माणूस जे जीवन जगतो ते सुख मिळविण्यासाठी व त्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी. तसंच आपल्याला हा जो मानवी जन्म लाभला आहे त्याचे प्रयोजन काय? जीवनाचा अर्थ काय आहे? असा प्रश्न केव्हा ना केव्हा प्रत्येक माणसाला पडतोच.
आपलं जीवन अर्थपूर्ण असावं, जीवनात काही तरी चांगले- वेगळं करावं, ही प्रेरणा उपजतच असते. पण तरीही बहुसंख्य माणसांना खऱ्या आनंदाचा- सुखाचा शोध लागत नाही आणि आपल्या जीवनाचे प्रयोजन समजत नाही, हीपण एक वस्तुस्थिती आहे. आज भौतिक संपन्नतेच्या जगात लौकीकार्थानं सुखोपभोगाला तोटा नाही. तरीही मग आपण अस्वस्थ का आहोत? तथाकथित भौतिक सुखही का टोचू लागतं? भोगाचा का कंटाळा येऊ लागतो? आणि मुख्य म्हणजे विंदांनी म्हटल्याप्रमाणे ‘तेच ते- तेच ते’ दिनक्रम करताना जीवनाची क्रियाच मुळी का निर्थक वाटू लागते? ज्याला विचार करायची सवय आहे व जो अंतर्मनात जागृत चिकित्सक आहे, त्याला जीवन अर्थशून्य वाटू लागतं आणि उदासीनता येऊ लागते.
शाश्वत सुखाचा शोध आणि जीवनाचा अर्थ लावणे या दोन्ही बाबींवर अनेक तत्त्वज्ञ, विचारवंत व धर्मगुरू यांनी बरंच काही लिहून ठेवले आहे. धर्म- अध्यात्म- तत्त्वज्ञान या अंगानं भक्ती व अध्यात्मामुळे चिरंतन सुख लाभतं आणि जीवन सुकर होतं, असं म्हटलं आहे. मला व्यक्तिश: पन्नाशीनंतरही हा आध्यात्मिक मार्ग चोखाळून सुखाचा शोध लागेल व जीवन सुकर होईल, असं वाटत नाही. कदाचित माझ्या इह व ऐहिकवादी वृत्तीची ती मर्यादा वा अज्ञान असेल. एक व्यापक कर्मकांडरहीत मूलभूत अध्यात्मिकता मला मान्य आहे. पण धर्म व ईश्वरोपासना हाच त्याचा एकमेव मार्ग आहे, हे बुद्धीला व तर्काला पटत नाही.
मग मला सतावणारा खरं सुख म्हणजे काय व जीवनाचं प्रयोजन काय आहे, या दोन जिज्ञासा व प्रेरणांचे का? मला त्याचा कसा शोध लागेल व कसा बोध होईल?
मी एक लेखक व वाचक आहे, त्यामुळे सुखाच्या तसेच दु:खाच्या क्षणीही पुस्तकांना जवळ करतो आणि माझा आनंद- सुख शतगुणित होतो आणि दु:खाचा निचरा होतो. मन कसं शांत- निर्विकार होतं. मला माहीत नाही, पण अशाच क्षणी मला अध्यात्माचा स्पर्श झाल्याचं जाणवतं.
शाश्वत सुख आणि जीवनाचं खरं प्रयोजन यासंदर्भात मलाही अनेकवार प्रश्न पडले आहेत आणि मन उदास होऊन गेलंय. त्याचा मी माझ्या बुद्धी-भावनेनं विचार करीत शोध घ्यायचा प्रयत्नही केलाय. पण लिओ टॉलस्टॉयच्या साहित्यातून मला त्या संदर्भात जे मिळालं, त्यानं माझा शोध थांबला आहे. माझ्या बुद्धी, भावना, प्रेरणा आणि वृत्तीला पटणारा व भावणारा अर्थ टॉलस्टॉयच्या ‘हाऊ टू रिड गॉस्पेल?’, ‘दि पाथ ऑफ लाईफ’ आणि ‘व्हॉट देन मस्ट वुई डू?’ या तीन निबंधांनी गवसला.
मी टॉलस्टॉयचा जबरदस्त फॅन आहे. त्याच्या तीन कादंबऱ्या ‘अ‍ॅना कॅरेनिना’, ‘वॉर अ‍ॅण्ड पीस’ आणि ‘रिझरेक्शन’ जगातील सर्वश्रेष्ठ कादंबऱ्या आहेत. टॉलस्टॉय, दोस्तोव्हस्की, शेक्सपिअर व आपले प्रेमचंद व शरदचंद्र चॅटर्जी हे पाच लेखक हे सर्वकालीन श्रेष्ठ मानवी जीवनाचे ललित भाष्यकार आहेत. जीवनाचे सर्व पैलू आणि मानवी मन, तिच्या भाव-भावना आणि विविध विकार समग्रतेनं जाणायचे असतील तर महाभारत व हे पाच लेखक वाचावेत. त्यानंतर दुसरं काही आयुष्यभर वाचलं नाही तरी चालेल. हे साहित्य वाचलेला वाचक हा कायम सुजाण व उदार राहील- असेल!
पण टॉलस्टॉयला जीवनाच्या उत्तरार्धात (व आधीही मधून मधून) शाश्वत सुख, जीवनाचे खरे प्रयोजन व धर्म- आध्यात्मिकतेबाबत प्रश्न पडत होते. त्याच्या स्वभावाप्रमाणे याही प्रश्नाला तो थेटपणे भिडला. तसा तो धार्मिक ख्रिस्ती होताच, पण कर्मकांडापासून शेकडो कोस दूर. त्यानं पुन्हा बायबलचा अभ्यास केला, सॉक्रेटिस, सॉलोमन, शोपेनहॉर, बुद्ध आदींचे ग्रंथ- विचार अभ्यासिले आणि मग त्याला गवसलेल्या अन्वयार्थाची परिणती म्हणजे वर नमूद केलेले निबंध होत!
ज्यांनी मी सार्वजनिक जीवनातली मूर्तिमंत शुचिता, साधुत्व आणि नैतिकतेचा प्रखर आवाज मानतो, त्या ग. प्र. प्रधानांनी टॉलस्टॉयला जी जाहीर पत्रे लिहिली व त्याद्वारे टॉलस्टॉयच्या जीवन, साहित्य व विचारांचा मागोवा घेतला, त्याचं ‘टॉलस्टॉय यांच्याशी पत्रसंवाद’ या नावानं पुस्तकही झालं, ते वाचताना टॉलस्टॉयच्या या तीन निबंधांचा आणि त्यानं सुख व जीवनाचा जो अर्थ लावला, त्याचं विवेचन प्रधान सरांनी स्वत:चे अंतरंग त्यात मिसळून जे केलं आहे, ते फार मूलगामी, मौलिक आहे. ते मी पुन: पुन्हा वाचलं आणि आता जर मला प्रशांत दामलेंनी ‘मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं?’ असा प्रश्न केला तर मी त्यांना त्याचं यथोचित उत्तर देऊ शकेन.
टॉलस्टॉयनं लोक का व कशा पद्धतीनं जगतात हे सांगताना म्हटलंय, लोक चार पद्धतीनं जगतात. काहीजण अज्ञानी असतात, काहीजण सुखोपभोगात जगत असतात, काहीजण शारीरिक व बौद्धिक सामथ्र्य मिळवीत जगतात, तर काहीजण दुबळेपणानं जगत राहतात. पण त्यांना शाश्वत सुख व जीवनाचा खरा अर्थ त्याद्वारे गवसत नाही. टॉलस्टॉयनं ‘हाऊ टू रिड गॉस्पेल’मध्ये यासंदर्भात पुढे असं म्हटलंय की, प्रत्येकालाच बुद्धी व सदसद्विवेकबुद्धी असते व त्या आधारे सत् काय असत् काय, चांगले काय व वाईट काय, हे तो ठरवीत असतो. माणसाला जीवनात केवळ वासनांची व शारीरिक प्रेरणांचीच- अ‍ॅनिमल इन्स्टिक्टचीच तृप्ती करायची नसते, तर या विश्वाचा आधार असलेल्या उदात्त शक्तीशी आपले नाते आहे, हे जाणून त्या उदात्त शक्तींच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे, तरच तो सुखी होईल.
या उदात्त शक्तींच्या आज्ञा कोणत्या? माणसांनी सुख-समाधानाने राहावे व जगात शांतता नांदावी यासाठी येशू ख्रिस्तांनी ज्या पाच आज्ञा दिल्या आहेत, त्याचे मोठे मार्मिक विवेचन टॉलस्टॉयने केले आहे. त्या आज्ञा अशा आहेत. एक- सर्वासोबत शांततेने राहा व कोणावरही रागावू नका. दोन- लैंगिक सुखाची इच्छा नैसर्गिक आहे, पण तिचे स्वैराचारात रूपांतर करू नका. पती-पत्नीचे पवित्र नाते जपा. तीन- कधीही शपथ घेऊ नका. जे सत्य आहे ते ‘हो’ किंवा ‘नाही’ या शब्दात सांगा. कोणाचा न्यायनिवाडा करीत त्याला दोषी ठरवू नका. चार- जो अन्याय करतो, त्याचा प्रतिकार बळाने करू नका, हिंसेचा प्रतिकार हिंसेने करू नका. पाच- देश-परदेश असा भेदभाव न करता सर्वाशी सख्यत्वाने वागा. टॉलस्टॉय पुढे असं म्हणतात, ख्रिस्ताने कुठेही ‘फॉलो मी’ असं म्हटलेलं नाही, तर ‘फॉलो द ट्रथ’ (सत्याचे पालन करा) असाच संदेश दिला आहे.
जीवनाचा अन्वयार्थ व जीवनाची सार्थकता या पाच ख्रिस्त आज्ञेत टॉलस्टॉयनं शोधली. तसा विचार केला तर थोडय़ाफार फरकानं सर्वच धर्मानं हेच तर सांगितलेलं आहे. याच्या आधारे जीवन सार्थक होऊ शकतं, असा टॉलस्टॉयचा विश्वास आहे. मला तो वाचताना व त्यावर विचार करताना मनापासून पटतो. कारण टॉलस्टॉय हा केवळ तत्त्वज्ञ विचारवंत नव्हता, तर कलावंत होता आणि खरा कलावंतच जीवनाचा खरा व समर्थ भाष्यकार असतो. मी धर्मगुरूपेक्षा कादंबरीकार श्रेष्ठ मानतो व त्याच्या विचारांना अनुसरतो. भगवद्गीतेपेक्षा ज्ञानदेवांचं ‘पसायदान’ मी मोठं मानतो तो याच श्रद्धेतून!
आता शाश्वत सुखाच्या शोधाबद्दल टॉलस्टॉय का म्हणतो ते पाहूया. ‘व्हॉट आय बिलिव्ह’ पुस्तकातील ‘दि पाथ ऑफ लाईफ’मध्ये त्यांनी एक मूलगामी विचार मांडला आहे. जर माणूस स्वत:साठी जगला तर त्याचं जीवन विफल होईल, पण जर कक्षा रूंद करून तो समाज व अखिल मानवजातीसाठी यांच्या सुखासाठी जगू लागला तर त्याचे जीवन सफल होईल.
माणसाला जर खरं सुख मिळायचं असेल तर काय केलं पाहिजे, याचे टॉलस्टॉयनं अनुभव व विचारमंथनातून गवसलेलं नवनीत सादर करीत लिहिलंय. सुखासाठी पहिली आवश्यक गोष्ट म्हणजे माणसाचे निसर्गाशी जिव्हाळ्याचे नाते हवे व त्यात कोणताही बिघाड आणता कामा नये. मानवानं मोकळ्या सूर्यप्रकाशात, धरतीमातेच्या कुशीत व वृक्षवल्ली-पशुपक्षी या सोयऱ्यांसोबत राहिलं पाहिजे. सुखासाठी दुसरी आवश्यक गोष्ट म्हणजे प्रत्येकानं आपल्या आवडीचं काम केलं पाहिजे व काही प्रमाणात अंगमेहनत केली पाहिजे. तरच शांत सुखाची झोप लागते. तिसरी गोष्ट म्हणजे, जिव्हाळ्याचे समाधानी कौटुंबिक जीवन. चौथी गोष्ट म्हणजे ‘जीवाचे मैत्र’. वेगवेगळ्या लोकांशी स्नेह-मैत्रीचे संबंध ठेवणे. पाचवी गोष्ट फार महत्त्वाची आहे- शरीर सुदृढ असतानाचा येणारा नैसर्गिक मृत्यू. अर्थात हे आपल्या हाती नसतं. या सर्वाचा परिणाम हा आहे की, व्यक्ती व समाजाचे सुख एकमेकांत गुंतले आहे व निसर्गाशी समरस होऊन त्याचा विध्वंस न करता एकरूप होण्यात आहे.
वाचकहो, तुम्हाला वाटेल, टॉलस्टॉयनं यात नवीन काय सांगितलं? नवीन नक्कीच नाही, पण ते अनुभवसिद्ध व पारखून- विचार करून घेतलेले जीवन तत्त्वज्ञान आहे. हे विचारकण अनुभवाचे आहेत, आचारायचे आहेत. ‘दि आर्ट लिव्हिंग’ही करून पाहण्यात व अनुभवात सामावलेली आहे. टॉलस्टॉय या कलावंत तत्त्वज्ञाचं हेच वैशिष्टय़ होतं. तो पुरेपूर जीवन जगला. त्याग आणि भोग, मोह आणि वैराग्य, पाप आणि पुण्याचा जगण्यातून त्यानं अनुभव घेतला व हंसक्षीर विवेकानं आपल्या लेखनातून शाश्वत सुख कशात असतं, हे सांगितलं.
मी असं मानतो की, धर्मज्ञ जे धार्मिक वचनातून सांगतात तेच श्रेष्ठ कलावंत साहित्यिक साहित्यातून सांगतात. ते अधिक जिवंत असतं. मन व बुद्धीला ते तीव्रतेनं पटतं. म्हणून टॉलस्टॉयला मी मानतो.
उद्या मला केव्हा जीवनाच्या प्रयोजनाबद्दल प्रश्न पडला व कशात सुख मानायचं, असं कोडं पडलं तर मी टॉलस्टॉयचे शब्द प्रमाण मानीन। त्याचं पुन्हा वाचन करीन आणि म्हणेन, येस. मला नक्की सांगता येईल, सुख म्हणजे काय असतं!
- लक्ष्मीकांत देशमुख

मंगळवार, १ मार्च, २०११

विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास जागृत करण्याची गरज !


कोणताही निर्णय घेण्याआधी जवळच्यांना अथवा वरिष्ठांना त्याविषयी विचारणे, हा मनुष्यप्राण्याच्या प्राकृतिक स्वभाव असणे

`प्रत्येक दिवसागणिक होणाऱ्या लहान मुलांच्या आत्महत्या आज राज्यस्तरावर चिंतेचा विषय बनला आहे. प्रतिदिन या संख्येत भरच पडते आहे. यापूर्वीही लहान मुलांच्या आत्महत्यांचे प्रसंग घडले नाहीत, असे नाही; परंतु अशा प्रकारे आत्महत्यांची मालिका सिद्ध होण्याची वेळ ही पहिलीच. कोवळया वयात मुलांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेणे, हे जसे आश्चर्यकारक आहे, तसे त्यांना हा निर्णय घेण्यास भाग पाडणाऱ्या किंवा तशी परिस्थिती निर्माण करणाऱ्या घटकांचा विचार करणेही तितकेच आवश्यक आहे. जीवन म्हणजे काय, ते जगायचे कसे, फुलवायचे कसे, जीवनात येणाऱ्या प्रसंगांना सामोरे कसे जायचे, जीवनातील निर्णय घ्यायचे कसे आणि त्यातून सामाजिक अन् कौटुंबिक भान राखायचे कसे, हा सारा भाग विद्यार्थी अवस्था ते तारुण्य यामध्ये मनुष्य शिकत असतो. या काळात येणाऱ्या अनुभवातून तो पुढे पुढे मार्गक्रमण करत असतो. या सर्व प्रवासात त्याला आवश्यकता असते ती योग्य मार्गदर्शनाची, त्याच्या भावनांना समजून घेणाऱ्या सहकाऱ्यांची. मग तो सहकारी कोणी का असेना. आई-वडील असोत, मित्र-मैत्रिणी असोत, शिक्षक असोत वा अन्य कोणी असोत. कोणताही निर्णय घेण्याआधी आपल्या जवळच्यांना अथवा वरिष्ठांना त्याविषयी विचारणे, हा मनुष्यप्राण्याच्या प्राकृतिक स्वभावच आहे. मग तो निर्णय एखादी नवीन वस्तू विकत घेण्याची असो वा जीवनातील एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याचा असो. या वेळी जर योग्य ते मार्गदर्शन मिळाले नाही, तर मनुष्य दुसऱ्या टोकाचाही निर्णय घ्यायला मागे-पुढे पहात नाही.

मनाला मानसिक आधाराची, भावनांना समजून घेण्याची नितांत आवश्यकता असल्याने त्यांची निकड पालकच पुरवू शकणे

मुलांच्या आत्महत्यांमागील बहुतांशी कारण हे पालकांचा त्यांच्यावरील वाढता दबाव, कोवळया वयात त्यांच्यावर लादलेले अपेक्षांचे ओझे, असे म्हटले जात आहे आणि बऱ्याच प्रमाणात ते खरेही आहे. सध्याच्या धावत्या जगात आई-वडील दोघेही मुलाच्या उज्वल भवितव्यासाठी चाकरी करण्याचा, धनसंचय करण्याचा मार्ग स्वीकारतांना पहायला मिळतात. ज्या कोवळया वयात मुलांवर संस्कार घडवण्याची आवश्यकता असते, त्या वयातच दिवसातील बराच वेळ त्यांच्यापासून दूर राहून काढला जातो. मुलांना आपली उणीव भासू नये; म्हणून हवे-नको ते त्यांना दिले जाते. घरात मन रमावे; म्हणून संगणक, व्हिडिओ गेम्स आणून दिले जातात. महागडे भ्रमणभाष (मोबाईल) दिले जातात. मुलाचा सांभाळ करण्यासाठी एखादी बाई कामाला ठेवली जाते. आपल्या पाल्याने शिकून मोठे व्हावे; म्हणून लाखो रुपये डोनेशन्स भरून नावाजलेल्या शाळेत प्रवेश घेतला जातो, सुप्रसिद्ध कोचिंग क्लासेस, शिकवणी लावली जाते. सर्व प्रकारची शैक्षणिक सामग्री आणून दिली जाते, गाइड्स आणून दिले जातात. हे सर्व दिले की, आपले आपल्या पाल्याप्रती इतिकर्तव्य संपले, आता आपल्या पाल्याने चांगल्यापैकी अभ्यास करावा, चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावे, ही अपेक्षा ते करू लागतात. परंतु मुले म्हणजे काही यंत्र नव्हेत की, चांगला कच्चा माल टाकला की, उत्तम दर्जाचे उत्पादन सिद्ध करू शकतील. मनुष्यप्राणी आणि निर्जीव वस्तू यांमधील मुख्य भेद हाच आहे की, मनुष्याला मन असते आणि त्या मनात भावना असतात. या मनाला मानसिक आधाराची, भावनांना समजून घेण्याची नितांत आवश्यकता या वयात असते आणि ही त्यांची निकड त्यांचे पालकच चांगल्यापैकी पुरवू शकतात.

आईचे प्रेम आणि वडिलांचा धाक मुलांना शिस्त लावत असणे

पूर्वी पालक आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, यासाठी अहोरात्र मेहनत घेत असत. जन्माला येणारे मूल गर्भात असतांनाच त्याच्यावर चांगले संस्कार व्हावेत; म्हणून स्त्रिया रामायण, महाभारत यांसारख्या ग्रंथांचे वाचन करत असत. मुलाला समजायला लागले, चार शब्द बोलता येऊ लागले की, त्याला शुभंकरोती म्हणणे, रामरक्षा पाठांतर करणे, गीतेतील अध्याय म्हणणे, जेवतांना प्रार्थना करून जेवणे, दिवेलागणीच्या वेळेस आणि शाळेत जातांना देवासह घरातील मोठ्यांच्याही पाया पडणे, यांसारखे संस्कार घडवले जात असत. अभ्यास, खेळ, अल्पाहार, जेवण यांच्या वेळा काटेकोरपणे पाळल्या जात असत. जेवणातही मुलांना पौष्टिक असा आहार दिला जात असे. आई, आजी आणि आजोबा यांजकडून इतिहासातील शूरवीरांच्या, समाजसुधारकांच्या गोष्टी ऐकवल्या जात असत. आईचे प्रेम आणि वडिलांचा धाक मुलांना शिस्त लावत असे. बालपणीच योग्य ते संस्कार मिळाल्याने पुढे व्यवहारातही त्यांना ते उपयोगी पडत असत.

आधुनिक साधनाच मुलांच्या कोवळया मनावर संस्कार करत असणे

सध्या मात्र चित्र फार पालटले आहे. आई-वडील चाकरी करू लागल्याने मुलांवर संस्कार ते कसे घडणार ? त्यात केबल दूरचित्रवाणी, संगणकीय जाल (इंटरनेट), व्हीडिओ गेम घरोघरी आल्याने ही आधुनिक साधनेच मुलांच्या कोवळया मनावर संस्कार करू लागली आहेत. केबल दूरचित्रवाणीवर दाखवले जाणारे हिंसक आणि बीभत्स चित्रपट आजचे पालक आपल्या लहानग्यांसह बसून पाहू लागले आहेत. सेन्सॉर बोर्डाच्या मर्यादा शिथील झाल्याने पूर्वी चित्रपटगृहांतही जी दृश्ये पहायला मिळत नसत, ती आता प्रत्येक चित्रपटात घर बसल्या पहायला मिळू लागली आहेत. निराशा, अपयश आल्यावर मृत्यूला कवटाळायचे असते, याचे धडे मुलांना अशा चित्रपटांतून मिळू लागले आहेत. आत्महत्या करण्याच्या विविध पद्धतींविषयीचे ज्ञान त्यांना संगणकीय जालावर, दूरचित्रवाणीच्या माध्यमातून सहज मिळू लागले आहे. ज्यामुळे आतापर्यंत परदेशात घडणाऱ्या लहान मुलांच्या आत्महत्या आज महाराष्ट्रातही घडू लागल्या आहेत.

अपयशातून मनाला झालेला घाव भरून काढण्यासाठी व्यसनाला जवळ केले जाणे अथवा आत्महत्या करणे

दूरचित्रवाणी, संगणकीय जाल यांसारखी लोकहितासाठी बनवली गेलेली माध्यमे आज लोकांच्याच जिवावर उठली आहेत. संगणकीय जालामुळे जग जवळ आले, असे म्हणतात; पण जग जसे जवळ आले, तसे त्या जगातील चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टीच लोकांवर परिणाम करू लागल्या आहेत. वाईट सवयी पटकन लागतात, त्याप्रमाणे मानवाने वाईटालाच अधिक जवळ केले आहे. इंग्रज जाऊन आज ६२ वर्षे उलटल्यानंतर देशाचे भावी आधारस्तंभ पाश्चात्त्य संस्कृतीच्या आहारी जाऊ लागले आहेत. अनैतिक गोष्टींचे स्तोम माजू लागले आहे. नितीमत्ता लयाला जाऊ लागली आहे. जीवनात येणारे अपयश पचविण्याची क्षमता आजच्या तरुणांत राहिलेली नाही. अपयशातून मनाला झालेला घाव भरून काढण्यासाठी एकतर व्यसनाला जवळ केले जाते, नाहीतर मरणाला कवटाळले जात आहे. तरुणांचा कित्ता आता हळूहळू किशोरवयीन मुलेही गिरवू लागली आहेत. हे या देशाचे दुर्दैवच म्हणावे लागेल.

परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी आपला आत्मविश्वास ढळता कामा नये !

आज पुन्हा एकदा आवश्यकता आहे, मुलांना पुराणातील, इतिहासातील गोष्टी सांगण्याची, त्यांच्यातील सुप्त असा आत्मविश्वास जागृत करण्याची. चिमुकल्या वयात अखंड ईश्वरभक्ती करून ध्रुवाने अढळपद प्राप्त करून घेतले, मरणयातना भोगूनही प्रल्हादाने नारायणाचा गजर मुखातून विरू दिला नाही. त्यामुळे भगवंताला त्याच्या रक्षणासाठी नृसिंह अवतार घ्यावा लागला. वयाच्या सोळाव्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी अखंड विश्वाला मार्गदर्शक ठरणारी ज्ञानेश्वरी लिहिली. सतराव्या वर्षी छत्रपती शिवरायांनी शत्रूच्या दाढेतून तोरणा गड मिळवला. २२ व्या वर्षी झाशीची राणी गोऱ्यांवर तुटून प्राणपणाने लढली. या साऱ्या घटना आपल्याला काय सांगतात ? परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी आपला आत्मविश्वास ढळता कामा नये. प्रत्येकामध्ये देवाने सुप्त अशी शक्ती दिलेलीच आहे. आपल्याला तिला केवळ जागृत करायचे आहे. ती एकदा जागृत झाली की, कितीही मोठी संकटे येवोत, त्यांना सामोरे जाऊन ती परतवून लावण्याचे बळ आपल्यात येते. परीक्षेतील अपयश, कोणी दिलेली अपमानास्पद वागणूक ही काही मोठी संकटे नाहीत की, ज्यासाठी देवाने दिलेला सुंदर असा मानवजन्म क्षणांत संपवून टाकावा. जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाला जो धीरोदत्तपणे सामोरा जातो, तोच जीवनात यशस्वी होतो. `अपयश ही यशाची पहिली पायरी आहे', असे म्हटले जाते. अपयशाला ढाल केले आणि आत्मविश्वासाची तलवार उपसली की, जीवनसंग्राम सहज जिंकता येतो, ही शिकवण आज मुलांना देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यासाठी पालक आणि शिक्षक यांनी पुढाकार घ्यायला हवा !

- श्री। घाणेकर, मुंबई.
http://balsanskar.कॉम/