गुरुवार, २२ ऑक्टोबर, २००९

जन्म ..


दवाखान्याचा सारा परिसर औषधांच्या वासाने भरलेला। परिचारिकांची मधूनच लगबग चालू होती. एखादा इंटर्नशिप करणारा शिकाऊ डॉक्टर स्थेटास्कोपशी खेळ्त वार्डमध्ये राउंडला जाताना दिसत होता. अविनाश नुकताच एक सिझेरियनची शस्त्रक्रिया आटपून लेबर रूममधून बाहेर पडला होता. बाहेर येऊन तो आरामशीर खुर्चीत बसला. आणि त्याच्या नजरे समोरून काही मिनिटा पुर्वी त्याने केलेली अवघड शस्त्रक्रिया त्याच्या नजरे समोर पुन्हा एकदा दिसू लागली...लेबर रूममध्ये जिवाच्या आकांताने प्रसुती वेदना सहन करणारी स्त्री, डॉक्टराना मदत करण्यासाठी आजूबाजूला उभ्या असलेल्या परिचारिका, आपला सीनियर डॉक्टर काय म्हणतोय हे ऐकण्यासाठी त्याच्याकडे पाहणारी नुकतीच रुजू झालेली त्याची सहयोगी डॉक्टर निशा सारेच तणावाखाली होते. नाही म्हणायला क्षण दोन क्षण तोही तेव्हा विचलित झाला. नैसर्गिक प्रसुती शक्य नसल्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागणार होती. कापाकापी करावी लागणार या जाणिवेमुळे त्याच्यातील संवेदनशील, हळवा अवी जागा झाला होता. पण ते तेव्हढयापुरतंच. पुढच्याच क्षणी त्याच्यातला डॉक्टर जागा झाला होता. सारं चित्त समोरच्या स्त्रीवर, तिच्या पोटातील बाळाच्या आगमनावर एकाग्र झालं होतं. त्याने हॅण्ड ग्लॉव्ज चढवले. निशाला, परिचारिकाना आवश्यक त्या सूचना देऊन त्याने चेह-यावर मास्क चढवला आणि शस्त्रक्रिया चालू झाली. सारं काही यंत्रवत, जणू ती माणसं नसून नव्या युगातले यंत्र मानव होते. यथावकाश ती शस्त्रक्रिया पूर्ण झाली. त्या बाळाने या जगातला पहिला श्वास घेतला आणि अविनाशनेही निश्वास सोडला. "डॉक्टर काय झालं ?" तो बाहेर पडताच त्या स्त्रीच्या नातेवाईकानी त्याच्याभोवती गर्दी करत विचारलं."मुलगा" समोरच्या लोकांच्या फुललेल्या चेह-याकडे पाहत त्याने आपल्या केबिनची वाट धरली...अवी अचानकपणे भानावर आला. नव्या जीवाचं या जगातील आगमन इतकं आनंददायी असतं, मग आपल्याला कसं काहीच वाटत नाही ? तो स्वताशीच हसला. वेडा आहेस तू... तुझ्यासारख्या प्रसुती तज्ञ कसं समजून घेणार हे सारं... रोज पाच सहा बाळं तुझं बोट धरून या जगात येतात. आणि तसंही तो इवलासा जीव, त्याची या जगाशी जमवून घेण्यासाठी चाललेली धडपड पाहून तुझ्या चेह-यावर स्मित उमटतंच की...सहजच त्याचं लक्ष भिंतीवरच्या हूकला अडकवलेल्या पांढ-या शुभ्र ऍप्रॉनकडे गेलं. तो एकटक गळ्यात लटकणा-या स्टेथास्कोपकडे पाहत राहिला. आपण डॉक्टर व्हावी ही आपली लहानपणापासूनची इच्छा होती. रोगपीडितांची सेवा, डॉक्टर या शब्दाला समाजात असलेला मान, या क्षेत्रात मिळणारा पैसा हे सारं नंतरचं होतं. आपण डॉक्टर व्हावं ही इच्छा मनात घर करून राहण्याचं मुख्य कारण होतं, तेव्हा असलेलं स्टेथास्कोप आणि ऍप्रॉन यांचं आकर्षण. नंतर पुढे समज आल्यावर रोगपीडितांची सेवा हे एकमेव ध्येय समोर ठेऊन त्याने वैदकीय शिक्षण घेतलं. तो बेसीनजवळ आला. ओंजळीत पाणी घेऊन चेहरा आणि हात स्वच्छ धुतले. भिंतीवरील हुकाला अडकावलेल्या टर्किश टॉवेलने पुसले. आता अगदी मोकळं वाटत होतं. त्याने मस्त शिळ घातली अगदी आपण दवाखान्यात आहोत याची पर्वा ना करता. एम बी बी एस, एम डी या सगळ्या पदव्यांपासून आता तो जणू अलिप्त झाला होता. आता तो होता फक्त अविनाश, अवी ... इतक्यात दारावर हलेकेच टकटक झाली..."कम इन..."हातामध्ये चहाचा थर्मास घेऊन निशा आत आली. निशा त्याची सहयोगी डॉक्टर. नुकतीच एम डी होऊन दवाखान्यात रुजू झाली होती. तोही तसा फार वरिष्ठ नव्हता. एम डी होऊन फार तर दीड वर्ष झालं होतं. त्याच्या गुणवत्तेमुळे या नावाजलेल्या दवाखान्याने त्याला संधी दिली होती. डॉक्टर कर्णिकांचा सहाय्यक म्हणून तो काम करत होता. पुढे वर्षभराने डॉक्टर कर्निकांनी जेव्हा दवाखाना सोडला, तेव्हा दवाखान्याच्या व्यवस्थापनाने बाहेरुन कुणी डॉक्टर आणण्याच्या भानगडीत न पडता अविनाशला त्या जागी बसवलं होतं. इतर वरिष्ठ डॉक्टरानी आरडाओरडा केला पण अविनाशची गुणवत्ता, त्याचं कौशल्य वादातीत असल्यामुळे त्याना नमतं घ्यावं लागलं होतं. आणि तो प्रसुती विभागाचा प्रमुख झाला होता. "निशा, एक विचारू ?’"परवानगी कशाला हवी आहे ?""तू हे सारं का करतेस ?""मी समजले नाही डॉक्टर...""मला असं म्हणायचं आहे की, माझ्यासाठी चहा आणणं, माझ्या टेबलावरच्या फुलदानीत रोज ताजी फुलं ठेवणं. आणि या बदल्यात मी तुला काय देतो तर, तू चुकलीस की ओरडा..."'डॉक्टर, तुम्ही माझ्यावर जे ओरडता ते मी शिकावं म्हणूनच ना ? आणि मीही जे करते आहे ते माझ्या वरिष्ठांसाठीच करते आहे, ज्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. डॉक्टर, प्रसुती साठी आलेल्या स्त्रीला जेव्हा तुम्ही धीर देता, तेव्हा वाटतं की, अस धीर देणं एक स्त्री असूनही आपल्याला जमणार नाही.""निशा चुकतेस तू. मी कधीही तुला कनिष्ठ मानलं नाही. तुही माझ्यासारखीच डॉक्टर आहेस. लेबररूम मध्ये नर्स जेव्हा बाळाला माझ्या हातात देतात, तेव्हा मी त्या बाळाच्या कानात सांगतो, मोठा जरूर हो, नव्हे तू मोठा होशीलच. परंतु कितीही मोठा झालास तरी इतराना कमी लेखू नको""हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे डॉक्टर."अविनाशने झटकन मान वर करुन निशाकडे पाहीलं. ओठ जरी शांत होते तरीही नजर जे बोलायचं ते बोलून गेली होती. त्याने हलकेच स्नित केलं. निशाही गोड हसली आणि बाहेर पडली. अवी तिच्या पाठमो-या आकृतीकडे एकटक पाहत राहीला.एक दिवस तो असाच आपल्या केबिनमध्ये बसला होता. एक नॉर्मल डीलीव्हरीची केस निशा पाहणार होती. त्यामुळे अगदी निवांत चालू होतं सारं. इतक्यात फोनची रींग वाजली. त्याने फोन उचलला. ’हेलो. मी डॉ. आविनाशशी बोलू शकते का?" आवाज स्त्रीचा होता. त्याने आवाज ओळखण्याचा प्रयत्न केला. जमेना. शेवटी त्यानेच तिची ओळख विचारली."मीच डॉ. आविनाश. आपण कोण?""वैष्णवी"अवी स्तब्ध झाला. त्याला काय बोलावे हे सुचेना. रिसीव्हर पकडलेला हात निर्जीव झाला आहे असंच क्षणभर त्याला वाटलं.त्या फोनवरच्या मुलीने आपलं बोलणं पुढे चालू ठेवलं."अवी, मला तुला भेटायचं आहे""...""अवी, काय झालं? ऐकतोयस ना मी काय म्हणतेय ते? उदया संध्याकाळी पाच वाजता मी तुझी तुझ्या दवाखान्यासमोरच्या रेस्टॉरंटमध्ये वाट पाहीन. चालेल ना?""हो" त्याच्याही नकळत तो हो म्हणून गेला होता.वैष्णवी. तो स्वत:शीच पुटपुटला. अन तो कधी भुतकाळात हरवला हे त्याचं त्यालाच कळलं नाही.वैष्णवी त्याची शाळेतील मैत्रिण. म्हणजे एकाच वर्गातील म्हणून मैत्रिण म्हणायची नाही तर ती त्याच्याकडे पाहतही नसे. पुढे अकरावी बारावीला असताना त्याला तिच्याबददल कधी आणि कशी ओढ वाटायला लागली हे त्याला कळलंच नाही. त्यानं तिला विचारलंही. पण तिच्या आणि त्याच्या घरच्या परिस्थितीमध्ये फरक असल्यामुळे तीने त्याला नाही म्हटलं. श्रिमंत नायिका आणी गरीब नायक हे फक्त कथा कादंब-यांमधेच शोभून दिसतात. तिचा नकार त्याने फारसा मनावर घेतला नाही. तसा तो जात्याच हुशार होता. बारावीला जीव तोडून अभ्यास केला. फ्रीशीपवर मेडिकलला गेला. पुढे कधीतरी तो एम बी बी एसला असताना वैष्णवी त्याला दिसली होती. पुन्हा एकदा त्याच्या मनातील तिच्याबददलच्या विचारांनी उचल खाल्ली. त्याने पुन्हा एकदा तिला विचारायचं ठरवलं. आपण आता मेडीकलला आहोत. अजुन दोनेक वर्षांनी डॉक्टर होऊ.त्यामुळे आता तरी ती आपल्याला नाही म्हणणार नाही असं त्याला वाटत होतं. आणि पुन्हा एकदा त्याची निराशा झाली होती. तिचं त्याच्याच वर्गातील एका मुलावर प्रेम होतं. हा घाव मात्र त्याच्या जिव्हारी बसला होता. पुरता कोलमडून गेला होता तो. ना त्याचं अभ्यासात मन लागत होतं, ना अन्नपाणी गोड लागत होतं. मित्रांनी कसंबसं सावरलं त्याला. त्यानेही स्वत:ला समजावलं. तिला जर तुझ्याबददल काही वाटत नाही तर तू तरी का एव्हढं वाईट वाटून घ्यावंस? जगात काय तिच एक मुलगी आहे? तुला दुसरी कुणी भेटणारच नाही का? तो पुन्हा अभ्यासात रमला. एम बी बी एस झाला. गायनॅकॉलॉजी घेऊन एम डी सुदधा केलं त्याने. आता तो स्थिरावला होता. रोज पाच सहा बाळं त्याचं बोट धरून या जगात येत होती. त्या बाळांच्या आया त्याला दुवा देत होत्या. निशाच्या रुपाने त्याला सहाय्यकच नव्हे तर एक चांगली मैत्रिणही मिळाली होती. आणि आज अचानक वैष्णवीचा फोन आला होता. जवळजवळ चार वर्षांनी तिचा आवाज त्याच्या कानी पडत होता. काय बोलायचं असेल तिला आपल्याशी? कशी दिसत असेल आता ती? आपण थोडे अस्वस्थ झाले आहोत हे जाणवताच तो स्वत:शीच हसला. विचार करण्याची गरज नव्हती. घोडामैदान जवळच होतं. ठरल्याप्रमाणे दुस-या दिवशी संध्याकाळी तो तिला भेटायला गेला. तिला पाहताच तो आश्च्रर्यचकित झाला. ती अजुनही तशीच दिसत होती जशी चार वर्षांपूर्वी होती."कशी आहेस?""ठीक आहे. तू कसा आहेस?""भला एक डॉक्टर कसा आहेस या प्रश्नाला काय उत्तर देईल?" ती हसली. त्याने आपलं बोलणं पुढे चालू ठेवलं."काय घेणार?""म्हणजे...?" "आपण रेस्टॉरंटमध्ये आहोत""सॉरी अवी. माझ्या लक्षातच राहीलं नाही. मला कुठलंही कोल्ड्रींक चालेल""बोल. काय बोलणार होतीस?" त्याने थंडा पित पित तिला विचारलं."अवी..." तिचे शब्द ओठातच अडखळले."वैष्णवी, एकदा बोलायचं म्हटल्यावर अडखळू नये माणसानं. अगदी मोकळेपणानं बोलावं.""अवी, माझ्या घरचे माझ्यासाठी मुलगा पाहत आहेत.""पण तुझं तर प्रेम आहे कुठल्यातरी मुलावर?""अवी, ते प्रेम नव्हतं. आकर्षण होतं. वेडं वय होतं. वाहवत गेले दिखाव्याबरोबर. पुढे जाणवलं की त्याच्याबरोबर आयुष्य काढणं जमणार नाही. त्यामुळे मी स्वत:हून त्याच्याबरोबरच नातं तोडलं.""चांगलं झालं. आणि आता तसंही तुझ्या घरचे तुझ्यासाठी मुलगा पाहत आहेतच की""अवी तसं नाही रे. एक विचारू मी तुला?""हो. विचार ना.""आर यु एंगेज्ड? आय मीन तुझं लग्न वगैरे ठरलंय का किंवा कुणा मुलीवर प्रेम आहे वगैरे?""उत्तर दिलंच पाहिजे का?" तीने ज्या पदधतीने ते विचारलं होतं ते त्याला बिलकुल आवडलं नव्हतं."उत्तर दयावं अशी अपेक्षा आहे."उत्तर दयायला अवी बांधलेला नव्हता. तरीही त्याने मनात चाचपणी सुरु केली. हीने आपल्याला नाकारल्यानंतर आपल्याला कधी कुणाची ओढ वाटली होती का? नाही. असं काही नाही. आणि हे तो स्वताच्या मनाशीच ठसवत असताना नकळत निशाचा चेहरा त्याच्या नजरेसमोर तरळला. आपल्याला निशाबददल "तसं" काही वाटतंय का? आणि पुढच्या क्षणी त्याला कळून चुकलं होतं, या प्रश्नाचं उत्तर ईतकं सहजा सहजी मिळणार नव्हतं. "वैष्णवी, माझं फक्त तुझ्यावर प्रेम होतं. तू मला नाही म्हटल्यावर मी कधी कुठल्या मुलीचा विचार केला नव्हता. आज मी माझं आयुष्य सुखाने जगतोय. एक डॉक्टर म्हणून मी करीयरच्या बाबतीत समाधानी आहे. जोडीदार, लग्न या गोष्टींचा विचार अजुनतरी माझ्या मनात आलेला नाही. जेव्हा येईल तेव्हा पाहीन मी काय करायचं ते. पण तू हा प्रश्न मला आता विचारायचं कारण काय?""अवी, मला तुझी जोडीदार म्हणून स्विकारशील?""काय?" अवी तिच्या या प्रश्नाने दचकला होता."अवी, मी तुला असं म्हणत नाही की तू माझा स्विकार कर. मला कुणाबरोबर तरी लग्न करावंच लागणार आहे. तू मला दोनदा विचारलं होतंस म्हणून... मला माफ कर अवी जर तुला माझं बोलणं आवडलं नसेल तर"अवी विचारमग्न झाला. नियती किती अजब गोष्ट आहे. आपण जेव्हा हिच्यासाठी रात्र रात्र रडत होतो तेव्हा हीं आपल्याकडे ढुंकुनही पाहत नव्हती. आणि आज...हिला केवळ दुस-या कुणाबरोबर लग्न करायचं आहे तर ती माझ्याकडे आली आहे. याचाच दुसरा अर्थ असा की ती माझ्याकडे एक पर्याय म्हणून आली आहे. तिला माझ्याबददल काही वाटतंय म्हणून नाही. जर खरंच तिला माझ्याबददल काही वाटत असतं कदाचित तिनं स्वताला सावरलं असतं आणि माझ्यापर्यंत आलीच नसती.हिच्या अगदी उलट निशा आहे. तीचं आपल्यावर प्रेम असेल किंवा नाही हे नाही सांगता येणार. पण तीची आपल्यावर माया आहे एव्हढं मात्र नक्की. आपण दवाखान्यात असताना सतत आपल्या मागे पुढे असते. आपल्याला काय हवं नको ते पाहते. आणि हे सारं करताना तीची आपल्याकडून काहीच अपेक्षा नसते. किती फरक आहे दोघींमध्ये. अवीला वैष्णवीच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असतं."वैष्णवी, का ते मी तुला नाही सांगू शकणार पण... मी तुझ्याबरोबर लग्न नाही करता येणार. तू तुझ्या घरच्यांनी पाहीलेल्या एखादया चांगल्या मुलाबरोबर लग्न कर आणि सुखी हो." त्याने एका दमात बोलून टाकलं. मान वर करुन वैष्णवीकडे पाहीलं. तिचे डोळे पाण्याने ओलावले होते. पण त्याचाही नाईलाज होता."चल निघुया आपण. बराच वेळ झाला आहे." आणि दोघेही दोन वेगळ्या वाटेने चालू लागले......आज पुन्हा एकदा अवीने सिझेरीयन करून एका बाळाला या दुनियेत आणलं. सिझेरीयन केल्यानंतर तो जसा नेहमी थोडासा उदास होत असा तसा आजही झाला होता. आणि आज का कोण जाणे त्याला त्या दिवशीचा वैष्णवीसोबतचा प्रसंग आठवला. थोडासा अस्वस्थ मनानेच तो आपल्या केबिनमध्ये आला. त्याचं काही तरी बिनसलं आहे हे जाणवून निशाही त्याच्या पाठोपाठ आली."डॉक्टर, काय झालं?""काही नाही गं. नेहमीचंच. पोस्ट सिझेरीयन उदासीनता." त्याने चेह-यावर हसू आणण्याचा केविलवाणा प्रयत्न केला."अवी काय झालंय? मलाही नाही सांगणार?" कधीतरी निशा त्याला नावाने हाक मारायची. विशेषत: तो जेव्हा नर्व्हस असेल तेव्हा. त्याने तिच्या नजरेला भीडवली. एक वेगळीच आश्वासकता तिच्या नजरेत त्याला दिसली. आणि त्याने तिला सारं काही सांगून टाकलं. "हम्म... पुढे काय?" त्याचं सांगून होताच तिने खेळकर चेह-याने त्याला विचारलं. "निशा, मस्करी करतेयस ना माझी?""नाही हो डॉक्टर. मला त्या तुमच्या हीरॉईनचं हसायला येतंय. कुणाबरोबर तरी लग्न करायचंच आहे ना म्हणून तू. वा,काय मुलगी आहे. आणि तुम्ही कधी काळी अशा मुलीवर प्रेम केलं होतं.""निशा. त्या वयात होतं गं असं. चांगलं वाईट असा विचार करण्याचं ते वय नसतं. कुणीतरी आपलं असावं एव्हढी एकच भावना मनात असते.""कळलं. जाऊ दया. विसरा आता ते. तुमच्या सारख्या गुणी, हुषार डॉक्टरला खुप चांगली मुलगी आयुष्याचा जोडीदार म्हणून मिळेल.""तशी एक चांगली मुलगी आता माझ्यासमोर उभी आहे.""डॉक्टर, आता तुम्ही माझी मस्करी करताय.""नाही निशा. मी अगदी मनापासून बोलतोय. होशील माझ्या आयुष्याचा जोडीदार?" त्याने ती काय उत्तर देते म्हनून निशाकडे पाहीलं. निशाचा चेहरा लाजेनं लाल झाला होता. "निशा बोल ना.""अवी, सारं काही मीच सांगायला हवं का रे. समजून घे की तू थोडंसं" ती अलगदपणे त्याच्या मिठीत विसावली. दोन प्रसुतीतज्ञांच्या प्रेमाने त्या मिठीत जन्म घेतला होता...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा